सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला असून, रविवारी रात्री कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला तर दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता २८ झाला. तर बाधितांची संख्या ६३१ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात गत पंधरा दिवसांत कोरोनाचे तब्बल १२८ रुग्ण वाढले आहेत. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत जून महिन्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर दहा नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
खंडाळा तालुक्यातील आसवली येथील ५० वर्षीय पुरुष तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांचेही मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील आसवलीच्या ५० वर्षीय पुरुषाला सारीचा आजार होता. जिल्ह्यात बळींची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील सोमेश्वरवाडी येथील ६८ वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील पाचवड येथील ३० वर्षीय पुरुष व विसापूर येथील ७१ व ६२ वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील काळोशी येथील ३९ वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील २९ व २६ वर्षीय पुरुष तसेच ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, पुणे येथू १८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.