सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन आहे. बदलत्या काळानुसार कार्यालयातील विभागांची संख्या वाढत गेली. त्यामुळे जागा अपुरी पडत होती. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी नवीन कार्पोरेट इमारत बांधण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या इमारतीमध्ये नैसर्गिक प्रकाश योजनेचा अगदी कौशल्याने वापर करण्यात आला आहे. अशा या अत्याधुनिक नव्या इमारतीमध्ये लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित होणार आहे.इंग्रजांच्या काळापासून जिल्हाधिकारी कार्यालयाची दगडी इमारत अद्यापही सुस्थितीत आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आणि कामाची व्याप्ती वाढल्यामुळे जुन्या इमारतीशेजारीच नवी इमारत बांधण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे काम करण्यात आले असून, तब्बल साडेपाच कोटी खर्च ही इमारत बांधण्यासाठी आलाआहे. इमारतीत जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश योजनेचा खुबीने वापर केला गेला आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर ‘टफन’ (तडा न जाणारी काच) बसविण्यात आली आहे. कितीही कडक उन्हामध्ये या काचेकडे पाहिल्यास डोळ्यांना आल्हादायक वाटावे, असे हे ‘टफन’ आहे. विजेच्या बचतीचा दृष्टिकोन ठेवून संपूर्ण इमारतीमध्ये एलईडी बसविण्यात आले आहेत. या इमारतीला पारंपरिक लुक न देता अत्याधुनिक असा कॉर्पोरेट लुक देण्यात आला आहे, अशी माहिती अभियांत्रिकी सहायक फारुख खान यांनी दिली आहे. तसेच नव्या व जुन्या स्थापत्य कलेचा पुरेपूर वापर या इमारतीमध्ये केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बैठक व्यवस्थाही चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)बाग-बगिच्याने नागरिकांचे स्वागत !या नव्या इमारतीसमोर आकर्षक बाग-बगीच्या तयार करण्यात आला आहे. या लॉनमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येणारी जनता सुखावत आहे. लिलीया, कर्दळ, आनंद, बॉटल ट्री यासारखी कित्येक सुंदर झाडे लावली आहेत. उन्हात उभे राहण्यापेक्षा या लॉनमध्ये बसण्याचा आनंद नागरिक लुटत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाची कार्पोरेट इमारत सज्ज !
By admin | Published: January 06, 2017 11:06 PM