सातारा : सभेच्या विषय पत्रिकेत विषय का घेतले नाहीत, अशी विचारणा करत उप मुख्याधिकारी संचित धुमाळ (वय ३२, रा. केसरकर पेठ, सातारा, मूळ रा. जोगवडी, ता. भोर, जि. पुणे) यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळला आणल्याप्रकरणी नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारेंवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नगरसेवक बाळू खंदारेंने दि. १३ रोजी हातात पाण्याची बादली घेऊन उप मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये प्रवेश केला. टेबलावर बादली ठेवून मी तुमच्या केबीनमध्ये प्रातविधी करणार, असे म्हणत पँट उतरवली.
अर्वाच्य भाषेत शिवीगाळही सुरू केली. मी सुचवलेले विषय सभेच्या विषय पत्रिकेत का घेतले नाहीत, असे ओरडून खंदारेंने दालनामध्ये गोंधळ घातला. टेबलवरून खंदारेंना खाली उतरविण्यास सांगितले असता धुमाळ यांचा हात जोराने झटकून धक्काबुक्की केली.
शिपाई देवानंद दळवी यांनीही खंदारेंना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही दमदाटी करून त्यांच्याकडून बादली हिसकावून घेतली. व पुन्हा टेबलावर ठेवली. या घडल्या प्रकरणात खंदारेंनी पालिकेच्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसमोर असभ्या वर्तन करून शासकीय कामात अडथळा आणला.
यापूर्वीही विनोद खंदारेंनी महिला कर्मचाऱ्यांशी शासकीय कामकाज करत असताना उद्धट वर्तन केले होते. परंतु खंदारेंच्या भीतीने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. खंदारे पालिकेत आल्यानंतर वारंवार कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून दमदाटी करून दहशतीचे वातावरण निर्माण करतात, असेही उप मुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.