महाबळेश्वर : मुख्याध्यापकास मारहाण केल्याप्रकरणी गेले नऊ दिवस पोलिसांना गुंगारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कुमार शिंदे हे बुधवारी सकाळी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. न्यायालयाने दि. ३० जूनपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, जामीन अर्ज मंजूर झाल्याने त्यांची नंतर सुटका झाली. याबाबत माहिती अशी की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो कपाटात ठेवल्याने चिडून नगरसेवक शिंदे व त्यांचा भाऊ योगेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना जबर मारहाण केली होती. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी कुमार शिंदेंसह बाराजणांवर गुन्हा नोंद केला होता. त्याच दिवशी ११ आरोपींना अटक करण्यात आली होती; परंतु या प्रकरणातील नगरसेवक कुमार शिंदे हे पोलीस ठाण्यातून नाट्यमयरीत्या गायब झाले होते. गेले नऊ दिवस पोलीस त्यांचा शोध घेत होते. न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शिंदे यांनी अर्ज केला होता. मात्र, जामीन मिळविण्यात त्यांना अपयश आले. बुधवारी सकाळी कुमार शिंदे आपल्या वकिलासह येथील पोलीस ठाण्यात हजर झाले. न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दि. ३० पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली. दरम्यान, न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाल्याने नगरसेवक शिंदे यांची सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवक कुमार शिंदेंना अटक
By admin | Published: June 25, 2015 1:00 AM