कऱ्हाड : शहरात सध्या सुरू असलेल्या ‘वायफाय’ सेवेच्या कामास मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी स्थगिती दिली असतानाही ठेकेदाराकडून काम सुरूच ठेवले जात असल्याने याविरोधात ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व श्रीकांत मुळे यांच्यासह विक्रम पावसकर, सुरेखा पालकर, शारदाताई जाधव, अरुणा शिंदे, बाळासाहेब यादव यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना हे काम रद्द करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शनिवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. तरीही शनिवारी दिवसभर ठेकेदाराने काम सुरूच ठेवल्याने नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले. निवेदनात दिलेली माहिती अशी की, शहरात मोठ्या प्रमाणात ‘वायफाय’ सुविधेची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे शहरातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात खोदण्यात आलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होत असून, हे काम बंद पाडावे अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी १७ डिसेंबर रोजी शहरातील ‘वायफाय’ सुविधेचे काम न करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या असूनही विनापरवानगी घेता शहरामध्ये ठेकेदाराकडून कामे सुरू करण्यात आली आहेत. याविषयी नगरअभियंता व बांधकाम विभागातील अधिकारी यांना सर्व माहिती माहीत असल्याने याचा त्यांनी तत्काळ खुलासा करावा व कंपनीच्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा यामध्ये तुम्हीही सहभागी आहात असे गृहीत धरले जाईल. या दोषी ठेकेदारासह अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करत आहोत. (प्रतिनिधी)
नगरसेवकांनी पाडले ‘वायफाय’चे काम बंद
By admin | Published: January 03, 2016 12:45 AM