वाई : ख्रिचन धर्मातील एका व्यक्तीचा खासगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दफनविधीचा अनुभव नसल्याने ‘हवी ती मदत करू; पण दफनविधी तुमच्या रूढीनुसार तुम्हीच करा,’ असे सरकारी यंत्रणेतर्फे सांगण्यात आले. मात्र, संबंधित धर्मातील कोणीतीही व्यक्ती एनवेळी उपलब्ध न झाल्याने नगरसेवक सतीश वैराट आणि त्यांचे सहकारी धावून आले.
कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा नगरपालिका किंवा शासनाच्या लोकांमार्फत अंत्यविधी करण्यात येतो.
वाई येथील रविवार पेठेतील मातंग वस्तीमध्ये एक ख्रिचन कुटुंब वास्तव्यास आहे. तेथील एकाला कोरोना झाला. त्यांच्यावर वाई येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांची मृत्यूशी झुंज सोमवारी अपयशी ठरली. त्यानंतर नगर परिषदेला सूचना देण्यात आली; परंतु व्यवस्थापनाकडून त्यांना असे सांगण्यात आले की, आम्ही आपणास आवश्यक असणारी सर्वती मदत करू; परंतु आमच्या पथकाला दफनविधी करण्याचा अनुभव नाही. तुमच्यातील काही व्यक्तींनी हा दफनविधी करावा. त्यांच्या समाजातील कोणीही उपलब्ध झाले नाही. ही बाब नगरसेवक सतीश वैराट यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांच्या समाजातील त्यांचे सहकारी घेऊन हा दफनविधी ख्रिचन धर्मगुरूंच्या सूचनेनुसार सर्व रूढी-परंपरेनुसार केला.
सतीश वैराट व त्यांच्या टीमने यंग विराट गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष दत्ता गायकवाड, हणमंत वैराट, प्रसाद वैरट, संदीप पवार, नातेवाईक, अभिजित दळवी, सागर दळवी यांनी यासाठी पुढाकार घेतला.