कऱ्हाड : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड शहरात शेकडोंचा जमाव जमला. या जमावाने बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारसह अन्य दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर जमाव बसस्थानक चौकातून पुढे विजय दिवस चौकाकडे गेला. तेथेही उघड्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. विजय दिवस चौकात उभ्या असणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षांवरही जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये रिक्षांच्या काचा फुटल्या.
पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे शहरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.