सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी सभासदांना देशोधडीला लावण्याचे काम केले असून, महाबळेश्वर शाखेसाठी खरेदी केलेल्या जागेत मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके व मच्छिंद्र मुळीक यांनी केला आहे. १.१५ कोटीची जागा नेमकी कोणाच्या फायद्याची? याचे उत्तर शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.शिक्षक संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव पाटील, रामचंद्र लावंड, बाळासाहेब साळुंखे, मच्छिंद्र मुळीक, बाळासाहेब सोनवलकर, सुनील सावंत, शिवाजी साळुंखे, महेंद्र जानुगडे, विष्णू खताळ, शिवदास खाडे, उपस्थित होते. संभाजीराव थोरात म्हणाले, ‘शिक्षक संघाकडे सत्ता असताना प्राथमिक शिक्षक बँकेचा नावलौकिकच वाढला होता; मात्र सभासदांची दिशाभूल करून समितीने सत्ता मिळवून सभासदांच्या हिताला तिलांजली देत स्वत:चा सार्थ साधला आहे. नोकरभरती असो, अथवा असे अनेक मुद्दे आहेत ज्याचा खुलासा विद्यमान अध्यक्ष विठ्ठल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे. विश्वास चव्हाण व त्यांच्या संचालक मंडळाच्या काळात बँकेच्या ८ शाखा व महाबळेश्वरसाठी जागा भाड्याने घेण्यात आली होती. या जागेच्या भाडे कराराचे नूतनीकरण करताना संबंधित घरमालकांची भाडेवाडीत फसवणूक झाल्याने ही जागा मोकळी करून देण्याबाबत मागील संचालक मंडळाच्या काळात दबाव वाढला होता. त्यामुळे पर्यायी भाड्याची जागा वाघ यांच्याशी अनेकवेळा वाटाघाटी करून निश्चित केली होती. (प्रतिनिधी)अभ्यासदौऱ्यावरून आले आणि व्याजदरात वाढ केलीबँकेच्या खर्चाने म्हणजेच सभासदांच्या पैशातून विठ्ठल माने व त्यांच्या सहकारी संचालकांनी गुजरात, राजस्थान, हरियाना, जम्मू-काश्मीर, उत्तरांचल, उत्तरप्रदेशचा दौरा करून सुमारे ८.५० लाख इतका खर्च केला. या दौऱ्यात अन्य बँकांचे कामकाज व आपल्या बँकेचे कामकाज याचा तुलनात्मक अभ्यास करून नवीन सुधारणा, कामकाज पद्धतीचे धोरणे आखणे, याबाबत निर्णय होणे गरजेचे होते. मात्र, अभ्यासदौऱ्यावरून आल्यावर सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात १ टक्के वाढ करण्याचा अभ्यासपूर्ण निर्णय विठ्ठल माने यांनी घेतला, असा सवाल संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके, मच्छिंद्र मुळीक यांनी यावेळी केला.
शाखा जागा व्यवहारात भ्रष्टाचार
By admin | Published: June 17, 2015 9:53 PM