मलकापूर : अचानक लागलेल्या आगीत कापूस गोदाम जळून खाक झाले़ शिवाजीनगर येथील भरवस्तीत ऐन लक्ष्मीपूजनादिवशीच मध्यरात्री ही दुर्घटना घडली. पालिकेच्या अग्निशामक पथकाने दोन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कापूस जळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील तुफैल मोबीन खान यांचा गादी कारखान्यांना कापूस पुरविण्याचा व्यवसाय आहे़ वर्षापूर्वी त्यांनी कापूस पुरविण्यासाठी शिवाजीनगरमध्ये भाडेतत्त्वावर गोदाम घेतले आहे़ गुरुवारी रात्री दहा वाजता ते नेहमीप्रमाणे गोदाम बंद करून घरी गेले़ मध्यरात्री गोदामातील कापसाला आग लागल्याचे आसपासच्या नागरिकांना समजले़ महेंद्र भोसले यांच्यासह नागरिकांनी आगीबाबत तुफैल खान यांच्यासह कऱ्हाड येथील अग्निशामक दलास खबर दिली़ मात्र, गोदाममध्ये कापूस व लाकडी फळ्या असल्यामुळे आगीने तत्काळ रौद्ररूप धारण केले़ या आगीत सव्वालाख रुपये किमतीचा दोन ट्रक कापूस, लाकडी फळ्या व इमारतीच्या छतावरील सिमेंट पत्र्यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले़ दरम्यान, कऱ्हाड अग्निशामक दलाच्या दोन बंबांच्या साह्याने दोन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले़ (प्रतिनिधी)प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलालक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे परिसरातील नागरिक व युवक जागेच होते़ हे गोदाम येथील भरवस्तीत आहे़ गोदामच्या चारही बाजूला घरे आहेत़ भर वस्तीत ही घटना रात्रीच्या वेळी घडली़ मात्र, महेंद्र भोसले यांच्यासह काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून आगीच्या ठिकाणी धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला़
मलकापुरातील कापूस गोदाम खाक
By admin | Published: October 25, 2014 11:52 PM