दहिवडी : माण तालुक्यात झालेल्या ४७ ग्रामपंचायतींच्या मतदानाची मतमोजणी सोमवारी दहिवडी येथील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजता होत आहे. आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिवसभर मतदानाची आकडेमोड तर रात्रभर धाकधुकीचे चित्र दिसत होते. मतांची वाढलेली टक्केवारी कोणाची जिरवणार व कोणाला तारणार याची चर्चा दिवसभर रंगली होती.
माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. इतर ४७ ग्रामपंचायतींसाठी ५२९ उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यापैकी १९३ जण बिनविरोध निवडून आले आहेत. झाशी येथील एक जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे ३३५ जागांसाठी ७२२ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. ४७ गावांसाठी १४७ मतदान केंद्रे होती. यासाठी ७३५ कर्मचारी १०० राखीव कर्मचारी ७ झोनल ऑफिसर यांनी निवडणूक प्रक्रिया पुर्ण केली आहे. ७५ हजार ५६२ पैकी ६० हजार २२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर टपाली मतदानही यावेळी झाले. २१२ जणांनी आपला हक्क बजावला.
चौकट
तीन वाजेपर्यंत निकाल
पहिल्या फेरीमध्ये हिंगणी, पिंगळी खुर्द, शिरवली, पानवण, मोगराळे. दुसऱ्या फेरीमध्ये पिंगळी बुद्रुक, कारखेल, राणंद, सोकासन. तिसऱ्या फेरीमध्ये पळसावडे, देवापूर, रांजणी, बोडके, गटेवाडी, गोंदवले खुर्द. चौथ्या फेरीत वरकुटे-म्हसवड, शिंदी बुद्रुक, ढाकणी, हस्तनपूर, राजवडी. पाचव्या फेरीमध्ये काळचौंडी, शेनवडी, धामणी, वडजल, वळई. सहाव्या फेरीत किरकसाल, वाघमोडेवाडी, वारुगड, श्रीपालवण, भांडवली. सातव्या फेरीत पर्यंती, शंभुखेड, कुळकजाई, शिंदी खुर्द, येळेवाडी, पिंपरी. आठव्या फेरीत बोथे, कुकडवाड, वडगाव. नवव्या फेरीत गोंदवले बुद्रुक, जांभुळणी. दहाव्या फेरीत शिंगणापूर, शेवरी, डंगीरेवाडी, खडकी तर अकराव्या फेरीत भालवडी, दिवडी अशी मतमोजणी होणार आहे. दुपारी तीनपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
चौकट-
संचारबंदी लागू
ग्रामपंचायत निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शैलेश सूर्यंवंशी, उपविभागीय दंडाधिकारी माण खटाव यांच्या आदेशानुसार दहिवडी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. सोमवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.