सातारा : देशातील आरोग्य अनावस्था, रेल्वे रस्ते अपघात, महिला अत्याचार, खून, ढोंगीबाबा अत्याचार, सामाजिक स्वास्थ्याची ढासळलेली परिस्थिती याचा विचार करून देशाची सत्यनिष्ठ श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीतर्फे करण्यात आली असून, पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाचा निषेधही शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यक्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कर्नाटकातील ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांची झालेल्या हत्येमुळे देशातील संविधानिक मूल्यांवर विश्वास असलेले जनमानस अस्वस्थ आहे. गौरी लंकेश, डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या व एकूणच द्वेषमूलक असहिष्णुता गुन्ह्यांचे बळी ठरलेले सामान्य नागरिक यांच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेच्या जीवित, वित्त सुरक्षिततेची हमी केंद्र शासन घेत नसल्याचेच दिसून आले आहे.
गुजरातमधील विविध आपत्तीमधील बळी ठरलेले शेकडो नागरिक, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, रेल्वे, रस्ते अपघातातील बळींची संख्या, उत्तर प्रदेशमध्ये नाहक मृत झालेली छोटी मुले, हरियाणातील व देशभरातील ढोंगीबुवांच्या अत्याचार पीडित महिला या यादेशातील असुरक्षिततेचे बळी आहेत. म्हणूनच याविषयी संवेदनशीलता दर्शवून केंद्र शासनाच्यावतीने जनतेस जीवित व वित्ताची हमी देणारी सत्यनिष्ठ श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, लाल निशाण पक्षाचे कॉ. शंकर पाटील, कामगार शेतकरी संघर्ष समितीचे कॉ. अस्लम तडसरकर, प्रा. विक्रांत पवार, विशाल कोतले, सिद्धात खरात, गणेश भिसे, राकेश खरात, दीपक धडचिरे, संतोष उघडे, सुधाकर काकडे, भालचंद्र माळी उपस्थित होते.