सातारा: पळसावडे, ता. सातारा येथे गर्भवती महिला वनरक्षक व तिच्या पतीला मारहाण करणाऱ्या माजी सरपंचासह त्याच्या पत्नीला स्थानिक गुन्हे शाखेने शिरवळ येथून अटक केली.रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघे रा.पळसावडे) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. रामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. याप्रकरणी वनरक्षक सिंधू बाजीराव सानप (वय २४, रा. दिव्यनगरी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.याबाबत अधिक माहिती अशी, सिंधू सानप व त्यांचे पती हे दोघे वनरक्षक आहेत. दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता पळसावडे येथे ते गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी प्रतिभा जानकर हिने वनरक्षक सिंधू सानप यांना ‘तू कामावरील बायका का घेवून गेली,’ असे म्हणत चापट मारत वाद घातला होता. यानंतर दि. १८ रोजी दुपारी पुन्हा संशयित महिलेने फोन करुन ‘तू वनक्षेत्रात यायचे नाही. आला तर मारेन’ असे म्हणत दमदाटी, शिवीगाळ केली.काल, बुधवार दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता तक्रारदार व त्यांचे वनरक्षक पती सुर्याजी ठोंबरे हे काम करत असताना तेथे संशयित आरोपी पती व पत्नी आले. संशयितांनी पुन्हा वाद घालत थेट वनरक्षक सिंधू सानप व त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सानप या गर्भवती असतानाही त्यांना मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी तत्काळ या प्रकरणाची सूत्रे हाती घेऊन आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्याची पत्नी शिरवळ येथे मुलाकडे गेली असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तत्काळ शिरवळ येथे रवाना करण्यात आली. मुलीच्या घरातून जानकर दाम्पत्याला अटक करून साताऱ्यात आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.जानकरची नेहमीच अधिकाऱ्यांना दमदाटीरामचंद्र जानकर हा नेहमीच सातारा जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांना दमदाटी करुन त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे आता काही अधिकारी सांगू लागले आहेत. त्याच्या त्रासामुळे त्याला कोणाही कार्यालयात येऊ देत नाहीत. कार्यालयात येणे अधिकाऱ्यांना शिविगाळ करणे आणि वाड्यावरुन फोन लावून चंपी करतो अशी धमकी देत असे.