पिंपोडे बुद्रुक : सोळशी येथील केदारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धनकवडी येथून फिरायला आलेल्या दाम्पत्याला चोरट्यांनी दगडाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड लुटली. यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, योगिराज विजय माने व त्यांची पत्नी पल्लवी हे धनकवडी येथून देवदर्शनासाठी सोळशी येथे आले होते. दर्शन घेऊन ते केदारेश्वर मंदिराकडे निघाले होते. मंदिर लांब असल्याने मध्यातून माघारी परत येताना तीन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यापैकी दोघांनी हातात दगड घेऊन फिर्यादी महिलेस व पतीस दमदाटी करून अंगावरील सोन्याची मागणी केली. भीतीपोटी त्यांनी अंगावरील दागिने, मोबाईल व पाच हजार रोकड दिली. दरम्यान, माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील व सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी फिर्यादीचा ॲपल कंपनीचा मोबाईल आढळून आला. दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दोन लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे तपास करत आहेत.