कोयनानगर : कोयना भागातील मिरगाव येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले दोन मृतदेह रविवारी आढळून आले. एनडीआरएफ व स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी दिवसभर बचावकार्य राबविण्यात आले. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यानी मिरगाव-हुंबरळी येथील घटनास्थळाची पाहणी करून स्थलांतरित कुटुंबीयांची भेट घेतली.
मिरगाव येथे रविवारी सायंकाळपर्यंत वसंत धोंडिबा बाकाडे व कमल वसंत बाकाडे दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. तर देवजी बापू बाकाडे व शेवंता देवजी बाकाडे यांचा शोध सुरू आहे. कोयना भागात झालेल्या भूस्खलनामुळे १६ जणांना जीवन गमावावा लागला आहे. यामध्ये मिरगाव ११, ढोकावळे ४ तर हुंबरळी १ व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी १४ मृतदेह आढळून आले असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी मिरगाव, गोकूळनाला, बाजे, हुंबरळी, नवजा येथील सुमारे ५०० ग्रामस्थांना कोयनानगर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ढोकावळे येथील १२५ जणांना चाफेर येथे स्थलांतरित केले आहे.