कऱ्हाड : विभागातील अनेक गावांमध्ये सध्या कूपनलिका बंद स्थितीत आहेत. वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक गावांमध्ये कूपनलिका आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून त्याची देखभाल दुरूस्ती केली जात नाही. परिणामी कूपनलिका असून अडचण, नसून खोळंबा अशा स्थितीत आहेत. कूपनलिकांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
स्मशानभूमीत कचरा
कऱ्हाड : येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. स्मशानभूमी परिसरात दुर्गंधीयुक्त कचरा साचला असल्याने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमी परिसराच्या स्वच्छतेकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पाण्याचा अपव्यय
कऱ्हाड : अनेक ठिकाणी पाणी आल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. दुकानांसमोर पाणी मारणे, वारंवार गाड्या धुणे अशाप्रकारे पाण्याची नासाडी केली जात असून, पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. याबाबत पालिकेने ग्रामस्थांमध्ये जागृती करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करावे.
रस्त्याची दुरवस्था
कार्वे : कार्वे गावाजवळील धानाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याचबरोबर खड्डेही पडले आहेत. याचा त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ व भाविक करीत आहेत.