लोकमत न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनासह पोलिसांवरही मोठा ताण वाढला आहे. असे असतानाच अवैध धंदेवाल्यांसह छोट्या-मोठ्या गुन्हेगारांनीही आता डोके वर काढल्याने ढेेबेेेवाडीचे पोलीसदादाही मेटाकुटीस आले आहेत. बोकाळलेले अवैध दारूचे धंदे आणि गावठी कट्टे कमरेला घेऊन मिरणाऱ्यांंच्या मुसक्या आवळण्याचे आव्हानच आता ढेबेवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील चित्र मागील काही दिवसांपासून बदलू लागलं आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्यातच भलंमोठं कार्यक्षेत्र, पोलीस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि वाढता पोलीस बंदोबस्ताचा ताण. याचाच गैरफायदा उठवत गुन्हेगारांना बळ मिळू लागले आहे, हे निश्चित.
चारच दिवसांपूर्वी मान्याचीवाडी (कुंभारगाव) येथे एका कुलूपबंद घरातून देशी दारूचा मोठा साठा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खबऱ्याच्या सहकार्याने ताब्यात घेतला. ढेबेवाडी पोलिसांना याची कानोकानही खबर नव्हती. तर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन युवकांमध्ये भर रस्त्यावर फिल्मीस्टाइल हाणामारी झाली. विशेष म्हणजे ऑन दि स्पॉट पोलीसही पोहोचले.
यावेळी दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. तेव्हा त्यापैकी एकाच्या हातात गावठी कट्टा सापडला तर दुसऱ्याच्या हातात लोखंडी पाइप आढळला. निश्चितच घटना एवढी भयानक होती की, पोलिसांनी धाडसाने दोघांनाही ताब्यात घेतले खरे. मात्र, ताब्यात घेईपर्यंत पोलिसांनाही हाणामारीच्या घटनेतील युवकाच्या हातात गावठी कट्टा असल्याची खबर नव्हती. प्रथमदर्शनी दोन युवकांमध्ये बाचाबाची चालू आहे, असे चित्र दिसल्याने पोलिसांनीही गाडी थांबवत दोन्ही युवकांना एकमेकांपासून बाजूला केले. मात्र, तोपर्यंत एकाला डोक्यात लोखंडी पाइप घालून घायाळ केले होते.
ही घटना कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावरील गुढेगावातील बसथांब्याजवळच घडल्याने मोठी गर्दी झाली होती. तर निपचित पडलेल्या युवकाच्या हातात गावठी कट्टा असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
चाैकट :
गावठी कट्टा कमरेला लावून गावातून संचार...
कमरेला गावठी कट्टा लाऊन संबंधित युवकाने गुढेगावात संचार केला. अनेकांना त्याने आपल्या शत्रूबाबत विचारणाही केली. अखेर त्या दोघांची भररस्त्यात भेट झाली आणि त्याने कट्टा काढण्याअगोदरच समोरच्याने त्याच्या डोक्यात लोखंडी पाइपचा फटका दिला. पोलीस वेळेत पोहोचल्याने अनर्थ टळला. संबंधित युवकाकडे गावठी कट्टा आला कुठून, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून चालू असला तरी ग्रामीण भागातही हाणामारीत आता गावठी कट्टा वापरला जात असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांना वचक ठेवावाच लागेल. त्यातच ढेबेवाडी हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील विभाग. मात्र, गुन्हेगारी क्षेत्रातही आता छोट्या मोठ्या फळकुटदादांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न चालू केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.