सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांजवळ सौजन्य अन् आपुलकीने वागल्यास निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात,’ असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले.पोलिसांबद्दल समाजात अनेकदा उलटसुलट बोललं जातं. मात्र, पोलीसही तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस असतो. हे विसरून चालणार नाही. अंगात वर्दी असल्यामुळे तो वर्दीचे इमान राखतो. एखाद्या दुसºयाच्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलच वाईट आहे, असा जो समज तयार होतो, तो चुकीचा आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करत असतो. त्यामुळे कळत न कळत काहीजण दुखावले जातात. साहजिकच अशा लोकांकडून समाजात गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा निराशाजनक असतो; परंतु आता हे सर्व बदलत चाललं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि प्रामाणिकपणाला पोलिसांकडून नेहमीच उत्तम प्रतिसाद असतो. पोलीस ठाण्यात येणाºया सगळ्याच लोकांना गुन्हेगाराच्या नजरेतून न पाहता त्यांच्याशी आपुलकीने आणि सौजन्याने वागल्यास अनेक प्रश्न काही क्षणातच सुटतात. हाच संदेश मी माझ्या अधिकारी आणि कर्मचाºयांना देत असतो,’ असे सांगून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुढे म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्थेच्या कामाबरोबरच नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. आपल्या आजूबाजूला घडणाºया घडामोडीवर प्रत्येकाने डोळसपणे पाहिले पाहिजे. तरच आपली स्वत:ची आणि आपल्या शेजाºयाची सुरक्षा अबाधित राहील. आपली लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे आहे. पोलिसांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे लोकांनीच सजग राहणे गरजेचे आहे.कायद्याचे पालन करताना काही वेळेला पोलिसांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. परंतु त्या पाठीमागची भूमिका ही लोकहिताची असते. माझे सर्व अधिकारी आणि सहकाºयांना याची जाणीव असते. त्यामुळेच नागरिक, युवक-युवती यांच्याशी त्यांची नाळ घट्ट होत चालली आहे. संवाद आणि आपुलकीमुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आगामी काळात बदलल्याचे दिसेल,’ असेही देशमुख म्हणाले.
सौजन्य अन् आपुलकीने निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:23 PM