सातारा : कोणाची बदली, घराची नोंद तर कोणाला वीज कनेक्शन मिळत नसल्याने आपल्या तक्रारी घेऊन राष्ट्रवादीच्या जनता दरबारात नागरिकांनी गर्दी केली होती. बहुतांश तक्रारींचा जागच्या जागी निपटारा होत होता, तर काही तक्रारी तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहत होत्या; परंतु अशा तक्रारींचे शंभर टक्के निरसन करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेण्याचेही ठरत होते. त्यामुळे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना राष्ट्रवादीच्या जनता दरबारामुळे दिलासा मिळत होता. ग्रामीण भागातून आलेल्या ६३ जणांनी आपल्या समस्या या जनता दरबारात मांडल्या. राष्ट्रवादीचे आमदार व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. रविवारी सकाळी अकरा वाजता जनता दरबारास सुरुवात झाली. आ. शशिकांत शिंदे आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते. तळेगावधामणी येथे साताऱ्याच्या अभियंता युवतीला बदली पाहिजे होती. त्या विभागातील दुसरे अभियंते इकडे यायला तयार होते. मात्र लालफितीच्या कारभारामुळे त्या युवतीला बदलीसाठी हेलपाटे मारावे लागत होते. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आ. शिंदे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर हा प्रश्नही मार्गी लागला. सातारा तालुक्यातील कळंबे येथील एका व्यक्तीला घर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होते. ‘बीडीओं’शी प्रत्यक्षात बोलल्यानंतर घर नोंद होण्याची चिन्हे अखेर त्या व्यक्तीला दिसू लागली. तीन गावांच्या सार्वजनिक रस्त्यांचा वादही या जनता दरबारात चर्चेला गेला. संबंधित अधिकारी आणि गावकऱ्यांच्या बैठकीची वेळ आणि दिवस ठरविण्यात आला. जबरदस्तीने जागा घेतली म्हणून एक महिला आपली तक्रार घेऊन आली होती. संबंधित व्यक्तीशी आणि एका अधिकाऱ्यांशी आ. शिंदे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. एका अपार्टमेंटला वीजवितरण कंपनीकडून कनेक्शन मिळत नव्हते. यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे होते. या तक्रारीचे निराकरणही या ठिकाणी तातडीने करण्यात आले. पाच लाख भरल्याशिवाय आॅपरेशन होणार नाही, आमदार फंडातून निधी मिळाला; मात्र टेंडर काढायला आठ महिन्यांचा कालावधी लागला, रहदारीला अडथळा येत असल्याने विद्युत खांब काढावा, अशा प्रकारच्या विविध समस्या घेऊन नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. (प्रतिनिधी)
दरबारात ग्रामीण जनता जास्त
By admin | Published: January 25, 2016 12:52 AM