पाटण : पाटण तालुक्यात २४१ ग्रामपंचायती असून, ग्रामपंचायत कर थकविणाऱ्यांनी ग्रामसेवकांना नाकीनऊ आणले आहे. वारंवार नोटिसा देऊन, दाखले देण्याचे बंद करूनही दखल न घेतलेल्या थकबाकीदारांना पाटण पंचायत समितीच्या प्रशासनाने न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १३५ ग्रामपंचायतींतील ४,५३९ थकबाकीदारांना या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे. याबाबत पाटण पंचायत समितीतून मिळालेल्या माहितीनुसार, कोणताही राजकीय गट-तट, पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती यांचा विचार न करता घरपट्टी थकबाकीदार असेल तर त्यांच्यावर सरसकट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे. सलग पाच वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीची घरपट्टी, पाणीपट्टी, वीजकर व इतर ग्रामपंचायत कर न भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सुमारे पन्नास लाखांहून अधिक रक्कम थकबाकीपोटी येणे आहे. या न्यायालयीन कारवाई अगोदर गटविकास अधिकारी व ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्यांनी गाववार बैठका घेऊन थकबाकीदारांना कर भरण्याबाबत बजावले आहे. मात्र, तरीही दखलही न घेणाऱ्या थकबाकीदारांची यादी व रकमा यांची यादी तयार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात १३५ गावांतील सुमारे ४,५३९ थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे.- अरविंद पाटीलगटविकास अधिकारी, पाटणवर्षाअखेरमुळे कटू निर्णयआर्थिक वर्षाचे शेवटचा महिना आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी असल्यामुळे पाटण पंचायत समितीने वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदारांना न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा धसका ग्रामस्थांनी घेतला असून ही कारवाई टाळण्यासाठी अनेकजण पळापळ करु लागले आहेत. मात्र यापुढे मोठ्या प्रमाणात वसुली होण्याची शक्यता आहे.
कोर्टाच्या नोटिसांनी थकबाकीदारांना घाम!
By admin | Published: March 02, 2015 11:38 PM