नागठाणे : सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथे चुलत भावाचा सुरीने गळा चिरुन खून केल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना बोरगाव पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत दिनकर ढाणे असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.बोरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, रमेश जयसिंग ढाणे आणि मंगेश जयसिंग ढाणे हे दोघे सख्खे भाऊ असून चंद्रकांत दिनकर ढाणे हा या दोघांचा चुलत भाऊ आहे. हे तिघेही गावामध्ये नेहमी एकत्रच असतात. शनिवारी रात्री हे तिघेही नागठाणे येथे तमाशाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. रविवारी सकाळी ते तिघेही गावामध्ये एकत्रच फिरत होते. यानंतर चंद्रकात हे रमेश आणि मंगेश यांच्या घरी गेले. येथेच या दोघांनी कांदा कापण्याच्या सुरीने चंद्रकांत यांचा गळा चिरून खून केला. यावेळी मंगेश आणि रमेश या दोघांचे वडील जयसिंग एका विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरांमध्ये तिघांव्यतिरिक्त अन्य कोणीच नव्हते. घटनेनंतर थोड्याच वेळाने चंद्रकांत यांनी आत्महत्या केल्याची माहिती मंगेश ढाणे याने गावच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता घराचा दरवाजा बाहेरुन लावलेला दिसला. आत पाहिले असता चंद्रकांत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर त्यांनी याची माहिती बोरगाव पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वासराव कदम आणि त्यांचे सहकारी दाखल झाले. घटनास्थळी दारुच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेला सुरा आढळून आला. त्यामुळे हा खून असल्याचे स्पष्ट झाले. अशी झाली संशयितांना अटकनिनाम पाडळी येथे चंद्रकांत ढाणे यांचा खून झाल्याची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना घटनास्थळी मंगेश दिसून आला नाही. त्यांनी अधिक माहिती घेतली असता मंगेश या घटनेची तक्रार देण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांचा प्राथमिक दर्शनी त्याच्यावर संशय असल्यामुळे त्याला वाटेतच ताब्यात घेतले. यानंतर काही वेळातच दुसरा संशयित रमेश याला काशीळ येथून ताब्यात घेतले आणि बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
चुलत भावाचा गळा चिरून खून
By admin | Published: January 26, 2015 12:41 AM