साताऱ्याच्या पश्चिमेकडील कास परिसरात पर्जन्याचे प्रमाण जास्त असल्याने परिसरातील शेतकरी भात, नाचणी, वरी यासारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगरी भाग व जंगल असल्याने पशुपक्ष्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यांच्यापासून पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी महिला शेणकूट थापण्यात गुंतल्या आहेत. पीक तोडणीला आल्यानंतर शेणकूट पेटवल्या जातात. त्यामुळे धूर झाल्यामुळे पक्षी येत नाहीत. तसेच धुरामुळे जाळ झाला असावा, असा समज झाल्याने प्राणीही तिकडे फिरकत नाहीत, असा शेतकऱ्यांचा समज आहे. उदरनिवार्हासाठी प्रामुख्याने मुख्य शेती व्यवसायाला जोडून पशुपालनही केले जाते. घरातील बहुतांशी लोक परगावी कामानिमित्त आहे. सर्रास लोकांना गॅस परवडणारा नसल्याने घरगुती वापरात चुली मोठ्या प्रमाणावर वापरतात. यासाठी तयार होणाऱ्या विस्तवासाठी गोठ्यातील शेण गोळा करून एका मोठ्या खडकावर, जमिनीवर तसेच कठड्यांवर शेणकुट्या थापतात. उन्हात वाळवून पावसाळ्याची सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या शेणकुट्या रचल्या जातात. या थरालाच ग्रामीण भागात शेणारा म्हटले जाते. बहुतांशी प्रत्येकाच्या घरासमोर अथवा रानात शेणारा रचला जातो. प्रामुख्याने या शेणकुटीचा वापर घरगुती वापरात स्वयंपाक व बंबासाठी फारच उपयुक्त असून, यात वापरल्या गेलेल्या भुशामुळे उष्णता फार काळ टिकण्यास मदत होते.उन्हाळ्याला सुरुवात होताच पावसाळ्यासाठी शेणाऱ्यासाठी शेणकुट्या थापण्यासाठी शेतकरी महिलांची लगबग दिसून येते आहे. भरउन्हात शेणारा तयार करण्यासाठी कष्टाने राबलेले हात अवकाळी पावसाने केलेले कष्ट व्यर्थ जाऊ नयेत, यासाठी हे शेणारे ताडपत्री अथवा प्लास्टिकच्या कागदाने झाकून ठेवतात. किमान एका शेणाऱ्यात पाचशे ते हजार शेणकुट्या रचल्या जातात. तसेच आपल्याला गरजेपुरती शेणकुटे शिल्लक ठेवून लोकांच्या मागणीनुसार विकल्या जातात. साधारण वीस ते पंचवीस शेणकुट्या असणारे एक पोते साठ रुपयांना विकले जाते.- बाबूराव भोसलेसध्या घरगुती वापरात चुली अथवा विस्तवासाठी रानटी शेणकुटी वापरली जाते. कष्टाने पिकवलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी रानात धुरी करण्यासाठी शेणकुट्यांचा वापर केला जातो. यावेळी एकापाठोपाठ शेणकुट्या रचून त्यावर भुसा टाकून रात्रभर ही धुरी पेटत राहते. यामुळे वन्य पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण होते.- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी कुसुंबीमुरा
शेणकूट करणार पशु-पक्ष्यांपासून पिकांची राखण
By admin | Published: March 27, 2016 9:39 PM