सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही विश्रांती आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास सहा दरवाजे बंद करून विसर्ग थांबविण्यात आला; पण सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा दोन दरवाजांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला, तसेच पश्चिम भागातही जोरदार हजेरी लावली, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस पडला होता. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. परिणामी, सुरुवातीला पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू करून विसर्ग करण्यात आला. त्यानंतरही धरणात पाणी वाढत असल्याने सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले. टप्प्याटप्प्याने दोन फुटांपर्यंत वर दरवाजे घेण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता; पण चार दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी धरणाचे दरवाजे एक फुटावर खाली घेण्यात आले. त्यातच पाण्याची आवक आणखी मंदावल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास धरणाचे दरवाजे पूर्ण बंद करून विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आलेला. मात्र, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडून विसर्ग सुरू करण्यात आला, तसेच धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिटही सुरू असून त्यातून २ हजार १०० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातून एकूण ५ हजार २८२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे सहा हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणात १०४.१४ टीएमसी पाणीसाठा होता.
कोयनेचे दरवाजे पहाटे बंद, सकाळी उघडले; सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 5:27 PM