पाटण तालुक्यामध्ये अशी बरीच पर्यटनस्थळे आहेत, जी आत्तापर्यंत दृष्टीपथात आली नाहीत. पर्यटकांना मोहात पाडणारी आणि वर्षानुवर्षे ‘हीडन’ असलेली काही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. त्यापैकीच प्राधान्याने नाव घ्यायचे झाले तर ते म्हणजे काटेटेक. काटेटेक हे गाव उंच डोंगरावर वसले असून, या गावातून काेयनेचे अथांग असलेले बॅक वाॅटर पर्यटकांना भुरळ पाडण्यासारचखे आहे.
पाटण तालुक्यात आता ‘न्यू महाबळेश्वर पाॅईंट’ तयार होतोय. कोयनेचे बॅक वाॅटर असल्यामुळे इथला निसर्ग पर्यटकांना मोहात पाडतोय. याची अद्यापही अनेकांना माहिती नसल्यामुळे पर्यटक तेथे पाेहोचत नाहीत. कोयनेच्या बॅक वाॅटरपासून एक किलोमीटर अंतरावर कास पठारासारखी फुलं उमलू लागलीत.
त्याचबरोबर ढेबेवाडी येथे असलेले वाल्मिक पठार हे आता पवनचक्कीचं पठार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. इथं पुरातन काळातील रामाचं मंदिरही आहे. ढेबेवाडी इथं फुलपाखरू पार्क आहे. इथे हजारो प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळतात.
कऱ्हाड - चिपळूण रस्त्याच्या बाजूने असणारे घनदाट अभयारण्यही पर्यटकांना मोहात पाडण्यासारखे आहे.
काही ठिकाणी रस्त्यावर वन्यजीवांचे दर्शन होते. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ‘शेकरू’ खास करून दिसतो. ‘ब्लूमाॅरमाॅन’ हे राज्य फूलपाखरू, ‘जारूल’ हे राज्य फूल, राज्य पक्षी ‘हरियाल’ही दिसतो. वैविधिक जैवविविधता असल्यामुळे कोयना अभयारण्य हे जागतिक पातळीवर जैवविविधता स्थळांत गणले जाते.
कोयना विभागातील पाथरपुंज हे गाव पाटण तालुक्यातील एक छोटंसं गाव. हे गाव सह्याद्रीच्या पठारावरील प्रचितगडाजवळ असून, समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीवर आहे. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांंच्या टोकावर वसलेले हे गाव. या गावात वारणा नदीचा उगम होतो. वारणा नदी सुरूवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. कडवी आणि मोरणा या नद्या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यामुळे इथलं निसर्गसाैंदर्य आणखीनच खुलून दिसतं.