सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवादविरोधी पथकाने रात्र गस्तीदरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेत ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या तरुणाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यात आढळून येणार्या बेकायदेशीर शस्त्रांबाबत कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यानुसार जिल्हा विशेष शाखा व दहशतवादविरोधी पथक गुरुवारी रात्री शहरात पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते, प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, सुमित मोरे, केतन जाधव, राहुल वायदंडे हे सातारा शहर व परिसरात रात्रगस्त करत होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास दिव्यानगरी ते कोंडवे रस्त्यावर गोवर्धन कॉलनी येथे एक अनोळखी तरुण या पथकाला पाहून तेथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीच्या मागे जाऊन लपून बसला. हे पाहताच पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. तसेच त्याची वागणूक व हालचालीवरून संशय वाढला. यावेळी झडती घेतली असता, त्याच्याजवळ एका पोत्यात ११ धारदार शस्त्रे मिळाली. यामध्ये ७ लांब कोयते आणि ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. या शस्त्रांची किंमत १८,५०० रुपये आहे. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव सचिन बाळू चव्हाण (वय २८, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) असे आहे.
दहशतवादविरोधी पथकाने तरुणाला पकडल्यानंतर त्याला सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले. तालुका पोलीस ठाण्यात या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
.........................................................................