सातारा : पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत आहे. कारण शाहूपुरीत आता खड्ड्यांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.वाहतुकीचे नियम सर्वांनाच सारखे असे म्हणतात. वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कोणत्या दिशेने चालवावी आणि पादचाऱ्यांनी कुठून चालावे? याचे संकेत ठरलेले आहेत. याची पायमल्ली करणाऱ्यांना शासन दरबारी दंडही भरावा लागतो; पण पावसाळा सुरू झाला की शाहूपुरी ग्रामस्थांवर नेमकं या पावसातच वाहतुकीचे सर्व नियम बाजूला ठेवून खड्डे चुकवत रस्त्यावरून जाण्याची वेळ आली आहे.शहराचे उपनगर म्हणून शाहूपुरीचा विशेष परिचय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाहूपुरीमध्ये राहणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विस्तार शाहूपुरीच्या दिशेने होत असल्याने शहराचे महत्त्वपूर्ण अंग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. मात्र, त्या मानाने नागरी सुविधांचा अभाव रस्त्यांकडे पाहिले असता जाणवतो.
शाहूपुरीच्या स्थापनेपासून तेथील रस्त्यांवर विविध माध्यमांतून विनोद झाले आहेत. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील स्थानिकांची रस्त्यांबाबत घोर निराशाच झाली आहे. पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून ही गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ अनुभवत आहेत.शाहूपुरीत राहणाऱ्या अनेकांना नोकरी, बाजारपेठ, शाळा, व्यवसाय, कॉलेज या कारणांसाठी दिवसातून किमान एक-दोनदा शहरात यावे लागते. तसेच शाहूपुरीला जोडून अनेक ग्रामीण भागाला हाच रस्ता जोडला गेला आहे, त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.या वर्दळीवर नियंत्रण आणून वाहतुकीचे काही नियम लागू होण्याची चिन्हे नाहीतच; पण पावसाळ्यातील या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरू पाहत आहे.
रस्त्यावर साठलेल्या खड्ड्यांतील पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तर वाहनांमुळे खड्ड्यांतील पाणी अंगावर उडू नये, यासाठी पादचाऱ्यांची कसरत सुरू असते. शाहूपुरीवासीयांना या बेडूक उड्यांपासून वाचविण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणाºयांकडून व्यक्त होत आहे.