लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील वाई आणि जावळी तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि निवारा केंद्रात किती दिवस राहणार आणि इतरांनी दिलेल्या मदतीवर कसे जगणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सरकार आणि सामाजिक संघटनांनी मदत केली; पण ती तात्पुरती आहे. ज्या घरांमध्ये रहायला जायचे आहे, त्या घरांना अगोदरच तडे गेलेले आहेत. घरात पाण्याचे उफळे फुटल्यामुळे भीती उफाळलेली आहे. अशा परिस्थितीत त्या घरात राहणे शक्य नाही. त्यामुळे या लोकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात २००५ मध्ये जुई आणि कोंडीवते या गावांवर दरडी कोसळल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तशीच परिस्थिती ही वाई तालुक्यातील देवरुखवाडी आणि जावळी तालुक्यातील आंबेघर आणि मिरगाव या गावातील लोकांचीही झालेली आहे. गावातील अनेक घरे दरडीखाली गाडली गेल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे तर सध्या जी घरे आहेत ती राहण्यायोग्य नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे या गावातील लोकांना तात्पुरत्या स्वरुपात घरे बांधून देण्याची आवश्यकता आहे.
गावाच्या जवळपासच लोकांना पत्र्याच्या शेडची घरे बांधून काही दिवस सुरक्षित ठेवावे लागणार असून, त्यानंतर त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचे काम करावे लागणार आहे. या लोकांसाठी आता राहण्याचाच नाही तर काही दिवस पोटापाण्याचाही प्रश्न सतावणार आहे. घरातील सर्व साहित्य चिखलात गेले. कसाबसा जीव मुठीत घेऊन लोकं घराबाहेर पडली. तेव्हा जीव वाचविण्याची गरज होती; पण आता जीव जगविण्याची भ्रांत निर्माण होणार आहे. त्यामुळे रहायला निवारा आणि पोटाला अन्न अशा दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना झगडावे लागणार आहे.
पावसाने गावातील शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या हंगामातील पीक तर वाया गेले असून, पुढील हंगामासाठी शेतीची डागडुजीही करावी लागणार आहे. त्यामुळे या लोकांचे पुनर्वसन करताना घर, अन्नपाण्याची व्यवस्था आणि नुकसानभरपाई अशा विविध पातळ्यांवर आढावा घ्यावा लागणार आहे. काही दिवस मदत मिळेल पण पुढे काय करायचे. आयुष्यभर एक-एक वस्तू साठवत उभारलेला संसार सोडून माळावर राहायची वेळ आलेल्या या लोकांचा प्रत्येकक्षणी जीव तीळ तीळ तुटत असतो. त्यातून सावरुन पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी समाज आणि सरकार या दोहोंच्याही मदतीची आवश्यकता आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित
एखादी घटना घडल्यानंतर नेते येऊन आश्वासन देऊन जातात. पण, पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत पडतो. कोयना परिसराला तर गेल्या साठ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न सतावतो आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे अजूनही योग्य पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे लोकांना ठाम भूमिका आणि विश्वास देण्याची आवश्यकता आहे.
अजूनही अनेक गावे दरडीखालीच
सातारा जिल्हा हा मुळात दुर्गम जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरडींच्या खोबणीत गावे वसलेली आहेत. कधी प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला तर कधी त्यांनी पुनर्वसन नाकारले. त्यामुळे अजूनही जिल्ह्यातील अनेक गावे दरडीखालीच वसलेली आहेत. त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडायचे आहे, पण योग्य पर्याय मिळत नसल्याने तर काहीजण आर्थिक अडचण असल्याने जीव धोक्यात घालून पावसाळ्यात रात्री जागून काढतात.