बाहेरच्यांनी जावलीत लक्ष घालू नये, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलल्यानंतर आता बाहेरचे कोण आणि स्थानिक कोण, असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला, तर त्याच्याही पलीकडे जाऊन आता सातारा तालुक्यातील भाजपमध्ये न गेलेला, पण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत असलेला परळी भागातील एक गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन ताकद मिळणार असून, राष्ट्रवादीचे सर्वच नेते आता एकजुटीने मैदानात उतरले आहेत.
सातारा तालुक्याचा पश्चिम भाग कायम दिवंगत अभयसिंहराजे भोसले आणि त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत राहिला आहे. पक्ष कोणताही असला, तरी शिवेंद्रसिंहराजे जिकडे असतील, तोच आमचा पक्ष आणि शिवेंद्रसिंहराजे आमचे नेते अशी सर्वांची भूमिका होती, पण सध्या वेगळेच वारे वाहू लागले आहे. एककेंद्री सत्तेमुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी ही बाब अनेकदा शिवेंद्रराजेंच्या कानावरही घातली, पण कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची तक्रार करत काही कार्यकत्यांनी आता मूळ राष्ट्रवादी पक्षात परतण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत परळी भागातील काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असून, आणखी काही कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मोठा धक्का बसणार असून, त्यांना या भागावर आणखी लक्ष द्यावे लागणार आहे.
आम्ही कोणाच्या मार्गात येत नाही आणि आमच्या मार्गात आडवे येणाऱ्याला आम्ही सोडत नाही, असा शिवेंद्रराजेंचा स्वभाव आहे. ते स्वत:हून कधीच कोणासाठी अडचणी निर्माण करत नाहीत, पण त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करणाऱ्यांचा कार्यक्रम त्यांच्या डोक्यात फिट्ट असतो. तरीही एवढे दिवस शिवेंद्रसिंहराजेंशी एकनिष्ट आणि कायम सोबत असलेला गट बाजूला का जातो, याचेही परीक्षण करण्याची वेळ शिवेंद्रसिंहराजेंवर आली आहे. ही बाब ते सकारात्मक घेऊन पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेसची नवी खेळी
परळी भाग हा राजे गटाला सोडून कधीही बाजूला गेलेला नाही. काही मतभेद असले, तरी ते त्या-त्या वेळी मिटविले गेले आहेत, पण ज्या भागाकडे फारसे लक्ष देण्याची गरज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना नव्हती, त्याच गटावर हल्ला करत राष्ट्रवादीने नवी खेळी केली आहे. खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी या भागावर अधिक लक्ष देत, नवीन खेळी खेळली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत आम्हाला संधी मिळाली नाही, तरीही आम्ही जोमाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबतच राहिलो. ते भाजपमध्ये असले, तरी आम्ही त्यांच्या सोबत होतो, पण गेल्या पाच वर्षांत आम्हाला ताकद मिळाली नाही. भागात काही कामे करताना राजू भोसले यांचे एककली नेतृत्व अडचणीचे ठरत आहे. बाहेरच्या लोकांना संधी दिली जाते. मात्र, स्थानिक लोकांचा विचार केला जात नाही. ही बाब शिवेंद्रसिंहराजेंच्या कानावर घातली, तरीही त्यामध्ये फारसा बदल न झाल्याने अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. १२ तारखेला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुमारे २०० कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
- शशिकांत वाईकर, कार्यकर्ते, परळी विभाग.