पेट्री : जावळी तालुक्यातील सह्याद्रीनगर ते चिकणवाडी मार्गावर अत्यंत अवघड घाटात पवनचक्की दुरुस्तीची क्रेन फसल्याची घटना सोमवारी रात्री घडली. दरम्यान, दोन दिवस या मार्गावरील वाहतूक बंद होती. मंगळवारी रात्री या ठिकाणच्या परिसरातून पर्यायी रस्ता करून दिल्याने छोट्या वाहनांची वाहतूक सुरू असून, फसलेली क्रेन बाजूला करून पूर्ववत पूर्ण रस्ता सुरू करण्याची मागणी होत आहे.
क्रेनच्या मागील चाकाखालील रस्ता पूर्णतः खचल्याने चाके अधांतरी व चाकांना जोडणारा लोखंडी रॉड मधोमध रस्त्यावर टेकल्याचे चित्र पाहावयास मिळत असून, ही क्रेन डोंगरातून खाली जाता-जाता वाचल्याने मोठा अनर्थ टळला. मागील काही दिवसांपूर्वी याच मार्गावर क्रेनखाली दुचाकी सापडून अपघात झाला होता.
क्रेन फसलेल्या ठिकाणी रस्ता फार अरुंद आहे. दरम्यान, या ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोरी आहे. परंतु, संरक्षक भिंत नाही. साईडपट्ट्या मातीने भरल्याने लगेच खचतात. मोऱ्यांना संरक्षक भिंत नसल्याने संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
२६पेट्री
सह्याद्रीनगर-चिकणवाडी मार्गावर अवघड घाटात क्रेन घसरून दोन दिवस वाहतूक बंद होती.
(छाया : सागर चव्हाण)