सातारा : गणेशमूर्ती विसर्जनासाठी जिल्हा परिषदेच्या जागेत तयार केलेल्या कृत्रिम तळ्यात सातारा शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील मूर्तींचे विर्सजन होणार आहे. त्यामुळे ताण लक्षात घेऊन मचानांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच मोठ्या मूर्ती केवळ क्रेनमधूनच तळ्यात नेण्यात येणार आहेत. प्रतापसिंह शेती फार्म येथे सार्वजनिक मंडळांसाठी कृत्रिम तळे काढण्यात येत आहे. यंदा हे तळे ९५ बाय ११० फूट रुंद व ३५ ते ३८ फूट खोल काढण्यात आले आहे. विसर्जनासाठी जवळपास २५ फूट पाणी या तळ्यात साठविण्यात येणार आहे. सध्या यात १२ ते १३ फुटांपर्यंत या तळ्यात पाणीसाठा करण्यात आला असून, विसर्जनपर्यंत तीन मोटारीद्वारे यात उर्वरित पाणीसाठा करण्यात येणार आहे. यंदा या तळ्यांची निर्मिती करत असताना प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले आहे. तळ्यावर एकाच ठिकाणी ताण पडू नये म्हणून मंडळाचे मोठे गणपती आणि घरगुती गणपती यांचे विसर्जनाचे विभाजन केले आहे. रस्त्याशेजारील बाजूस २० बाय २५ चा भव्य स्टेज उभारण्यात आला असून, येथून फक्त मंडळाच्याच मूर्ती विसर्जन केल्या जाणार आहेत. या मचानावर एका वेळेस केवळ वीस माणसांनाच जाता येणार आहे. प्रतापसिंह फार्म मुख्य गेटमधून आत आल्यावर येथे २४ बाय २० चा एक मचान उभारण्यात आले आहे. या ठिकाणाहून फक्त ३ फुटांपर्यंत घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. येथे पत्र्यांचे कंपाऊंड केल्याने या दोन्ही ठिकाणी गर्दी न होता व्यवस्थिरीत्या विसर्जन करता येईल. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाहण्यासाठी आलेले लोक तळ्याच्या ठिकाणी गर्दी करतात. तसेच मचानावर गर्दी केली जाते. त्यामुळे दुर्घटना घडतात. त्यासाठी पोलिसांनी कोणालाच वर पाठवू नये, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) हवेच्या सहा ट्यूब टाकल्या विसर्जनावेळी अनुचित प्रकार घडलाच तर तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी सहा बाजूंना सहा ठिकाणी हवेच्या ट्यूब दोऱ्या बांधून टाकल्या आहेत. या दोऱ्या नेऊन तत्काळ मदत पोहोचविता येणार आहे. क्रेनच्या पाटावर पालिकेचेच कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती मचानावर आणले जाते. तेथून ते क्रेनच्या पाटावर ठेवल्या जातील. पाटावर पालिकेची पाच ते सहा माणसे मूर्ती घेऊन जातील. गणेशमूर्तींची उंची व वजन यांचा विचार करून गरजेनुसार माणसांची संख्या वाढविली जाईल.
मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार क्रेनमधूनच
By admin | Published: September 11, 2016 11:45 PM