दहिवडी : माण नदीला सध्या बऱ्यापैकी पाणी असून, हे वाहून जाणारे पाणी अडवणे गरजेचे आहे. नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावर लोखंडी फळ्या बसवल्या नाहीत आणि ज्या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवल्यात त्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने निसर्गाने दिले अन् कर्माने नेहले, अशी परिस्थिती माण तालुक्यात आहे. याची देखरेख पाटबंधारे विभागाकडे आहे. मात्र, हा विभाग लक्षच देत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या आठवड्यात जर व्यवस्थित फळ्या बसवल्या नाहीत, तर पाटबंधाऱ्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा नदीकाठच्या लोकांनी, शेतकऱ्यांनी दिला आहे.यावर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे माण तालुक्यात असणारे ब्रिटिशकालीन तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, नाला बांध, नदी, ओढे यामध्ये चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती दिली. या विश्रांतीमुळे माणमधील नदी, ओढ्यांचे पाणीपातळी कमी झाली. प्रामुख्याने ज्वारी पिकाला पाणी देणे सुरू असल्याने शेतकरी त्या कामात होत. मात्र,चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने कमी झालेला पाणीसाठा वाढला आणि नदीला चांगल्याप्रकारे पाणी वाहू लागले. या नदीवर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून, आॅक्टोबर महिन्यानंतर या बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवून पाणीसाठा केला जातो. सध्या नोव्हेंबर महिन्याचा अर्धा काळ संपला तरी अनेक ठिकाणी पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यात लोखंडी फळ्या बसवल्या नाहीत. ज्या ठिकाणी बसवल्या तिचे पाणी लिकेज होऊन वाया जात आहे. मग काय उपयोग म्हणून चांगल्या पद्धतीने फळ्या बसवल्यास पाणीसाठा होऊन विहिरींच्या पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होईल. गोंदवले खुर्द येथे ज्योतिबा मंदिराशेजारी असणाऱ्या बंधाऱ्यात फळ्या टाकण्याचे काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने ठेका दिलेल्या कामगारांना फळ्या व्यवस्थित बसवा, अशी विनंती केली. तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या ‘शेतकऱ्यांना आम्हाला सांगू नका, तुम्ही निघायचे बघा,’ असा सल्ला दिला. यात चांगली वादावादी झाली. तरीसुध्दा या कर्मचाऱ्यांनी लोखंडी फळ्या व्यवस्थित न बसवल्याने पाणी वाया जाणे सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. (वार्ताहर)‘बंधाऱ्यांना लोखंडी फळ्या बसवण्याचे काम सुरू असून, हे काम विटा (सांगली) येथील मजूर संस्थेला देण्यात आले आहे. कर्मचारी कमी असतानासुध्दा आम्ही व्यवस्थित लक्ष देत आहोत. लोकांनी शेतकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे.’ - ए. डी. खारतुडे पाटबंधारे कार्यालयाचे प्रमुख
बक्कळ पाणी खळाळलं; कर्मानं वाहून गेलं!
By admin | Published: November 21, 2014 9:08 PM