लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सुशासन निर्माण होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर जनता आणि प्रशासनातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी रविवारी केले.
दरवर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘सुशासन दिवस’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी जाधव बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्वस्पर्शी विकास आणि समन्वयाचा मोठा संबंध आहे. जनता आणि प्रशासनामध्ये सुसंवाद असेल तर सुशासन निर्माण होणे अत्यंत सुलभ होते. जबाबदार प्रशासन आणि सर्वस्पर्शी विकास यांचाही घनिष्ठ संबंध आहे. यामध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेणे हे सुशासन दिवसामागील उद्दिष्ट आहे. तसेच सुनियोजित उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य मार्ग निवडून सामूहिक प्रयत्न करणे म्हणजेच प्रशासन होय. अशा प्रकारचे लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. त्याचबरोबर प्रशासनात सुलभता आणि पारदर्शकता येणे महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टींमधून समाजातील सर्व घटकांचा विकास साधला जातो.’
‘नागरिक, शासन आणि प्रशासन हा त्रिकोण जास्तीत जास्त सशक्त करणे गरजेचे असून त्या दृष्टीने जिल्हा परिषद कायम कार्यरत असते. अधिकारी आणि कर्मचारी सर्व प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. उपक्रमशीलता आणि सातत्य हे सातारा जिल्हा परिषदेचे वैशिष्ट्य आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी गतिमान प्रशासनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत,’ असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी स्पष्ट केले.
....................................................................