सातारा: ‘कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकासाबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवडीसाडी प्रोस्ताहित करून उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा,’ असे निर्देश मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिले.
दरे, ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी बुधवारी झालेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे म्हणाले, पाऊस लांबणीवर गेला असून कोयना जलाशयातील पाणीसाठाही कमी झालेला आहे. त्यामुळे जलाशयातील गाळ काढण्याची संधी उपलब्ध झाली असून, गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत तात्काळ धरणातून गाळ उचलण्यात यावा. यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा.
जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग व्यवस्था, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेकडील विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक समिर शेख यांनी तापोळा येथील पोलिस चौकी सुधारणेचे काम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे सांगितले.
कृषी पर्यटनावर भर : जितेंद्र डुडीजिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी ‘आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र' ही नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकºयांचे आर्थिक उपन्नत वाढावे यासाठी कृषी पर्यटनावर भर देण्यात येत आहे. अशी माहिती या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.