सातारा : भवानी पेठेतील महेश नागरी पतसंस्थेत खोटी कागदपत्रे तयार करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जयसिंग जाधव (रा. करंडी, ता. सातारा) याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, भवानी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल जाधव हा २००३ ते २०१३ दरम्यान महेश नागरी पतसंस्थेचा दैनंदिन कारभार पाहत होता. संस्थेचे सर्व रेकॉर्ड त्याच्या नियंत्रणात होते. त्याने आपल्या अधिकाराचा वापर करत खोटी कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारे विविध कर्ज व सेव्हिंग खात्यामध्ये खोटे हिशेब जमा-खर्च लिहिले.
रेकॉर्डमध्ये व्हाईटनरच्या साह्याने खाडाखोड नोंदी बदलून सुधीर जयसिंग जाधव, विजया अनिल जाधव, जयसिंग मानसिंग जाधव (सर्व रा. करंडी), अजित श्रीमंत देशमुख व शिवाजीराव बाजीराव देशमुख (दोघे रा. मांडवे, ता. सातारा) यांच्या संगनमताने संचालक मंडळाची परवानगी नसताना १ कोटी २१ लाख ८ हजार रुपयांचा अपहार केला.याप्रकरणी सनदी लेखा परीक्षक हेमंत अनंत कुलकर्णी (रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सर्व सहा संश्यित आरोपींना अटक केली आहे.