रामापूर : पाटण शहरात शनिवारी सकाळपासून पूर्णत: कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. नगरपंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. शहर प्रशासन, तालुका प्रशासन ,पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी गस्त घालण्यात आली. त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. कोणीही विरोध दर्शविला नाही.
गत काही दिवसांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात आणि शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाली आहे. नागरिक बाजारात आणि शहरात ठिकठिकाणी गर्दी करत होते. यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढते आहे. कोरोनाबाधितची साखळी तोडायची आहे. त्यासाठी लॉकडाऊन घेतल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही म्हणून जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने वीकेंड लॉकडाऊन शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्याला पाटण शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि मुख्य चौकात शनिवारी सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळाला. रस्त्यावर फारशी वाहने नव्हती. शहरात चौकात असणाऱ्या रिक्षादेखील पाहायला मिळत नव्हत्या. शाळा, कॉलेज, खासगी क्लासेस देखील बंद ठेवण्यात आली आहेत.
शहरातील नगरपंचायतच्या वतीने सांगितलेल्या सूचनांचे पाटणमधील नागरिक, व्यापारी पालन करत असून, यापुढेही नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाटण नगरपंचायतचे मुख्य अधिकारी अभिषेक परदेशी तसेच नगराध्यक्ष अजय कवडे यांनी केले.
फोटो : १० जाधव सर
फोटो : पाटण शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते सुनसान झाले होते.