सातारा : विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी पोलिस प्रशासनाने २० डीजे धारकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवले आहेत. तसेच न्यायालयातही खटले दाखल केले आहेत. प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे. दरम्यान, तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, सातारा तालुका यांनी सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतील एकूण ९७ सराईतांवर तडीपारीची कारवाई केली होती. हा तडीपारी आदेश असूनही कारवाई सराईतांनी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा प्रवेश केला. त्यामुळे तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच गणेशोत्सव कालावधीमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनीक्षेपण यंत्रणेचा वापर करुन ध्वनी प्रदूषण कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने एकूण २० डीजे धारकांविरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा यांच्याकडे प्रस्ताव व न्यायालयाकडे खटले पाठवले आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मिरवणुकीमध्ये ज्यांनी प्लाझ्मा, बीम लाईट आणी लेझर बीम लाईटचा वापर केला आहे अशा ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन जप्तीची कारवाई केली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार देशमुख, राहुल घाडगे, विश्वनाथ मेचकर, दीपक इंगवले, संदीप पवार यांनी ही कारवाई केली.
साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत लेझर बीम लाईट वापरणाऱ्या ८ जणांवर गुन्हा, पोलिस प्रशासनाचा दणका
By दीपक देशमुख | Published: September 20, 2024 3:30 PM