कऱ्हाड : बोगस कर्जप्रकरण करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी कासारशिरंबे ता. कऱ्हाड येथील पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळासह एका राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कासार शिरंबे येथील अॅड. सुहास तुकाराम गायकवाड यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारशिरंबे येथे शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळवून देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेमध्ये सुहास गायकवाड यांना सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले होते. दरम्यान आॅगस्ट २०१२ ते २० मे २०१५ पर्यंत सुहास गायकवाड यांनी बँकेकडून कसल्याही प्रकारचे कर्ज घेतले नव्हते. असे असताना हनुमान पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळासह बँकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून गायकवाड यांच्या नावे दीड लाखाचे पिककर्ज व ५० हजाराचे तात्काळ कर्जप्रकरण केले. या दोन कर्जप्रकरणांची कागदपत्र त्यांनी तयार केली. तसेच संस्थेच्या खात्यात कर्ज फेडीसाठी जमा केलेले १ लाख ८५ हजार रूपये कर्जफेडीसाठी न वापरता पाणी पुरवठा संस्थेच्या संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. त्यातून गायकवाड यांची ३ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली. सुहास गायकवाड यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार हनुमान पाणी पुरवठा संस्थेचे संचालक मंडळ व बँकेच्या अधिकाऱ्यांवर कऱ्हाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पाणी पुरवठा संस्थेच्या संचालकांसह बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा
By admin | Published: September 21, 2015 11:35 PM