सातारा : पोलिसांची परवानगी न घेता बेकायदा आंदोलन केल्याचा ठपका ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील मोती चौकात दि. १५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन केले होते.
या आंदोलनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती. हे आंदोलन सुरू असताना शाहूपुरी पोलीस तेथे पोहोचले. हे आंदोलन बेकायदा असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीर जमाव जमवून उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या नावावे बोंबाबोंब आंदोलन सुरू केले. मै भी सावरकर, राहुल गांधींचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन व बेकायदा जमाव जमाव जमविल्याप्रकरणी सहायक फौजदार नारायण मोहिते यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, विकास गोसावी, अॅड. प्रशांत खामकर, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, सुर्वणा पाटील, प्रवीण शहाणे, नगरसेविका दीपिका झाड, प्रवीण शहाणे, विठ्ठल बलशेटवार, रवींद्र पवार, गणेश मेळावणे, जितेंद्र नलवडे, सुनिल काळेकर, अमोल कांबळे, सागर भिसे, निलेश कदम यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर १४३ (बेकायदा जमाव जमविणे), १८८ (पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे) या कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.