पिंपोडे बुद्रुक : शासकीय हद्दीतील ओढ्यात स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर वाठार स्टेशन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे तळिये (ता. कोरेगाव) येथील गावाच्या दक्षिणेस असलेल्या ओढ्यात ट्रॅक्टर (एमएच११ बीए ६७२) व ट्रॉली (एमएच ११ आर ८६०८) यामध्ये जवळपास पाच हजार किमतीची अर्धा ब्रास वाळू विनापरवाना खोदल्याचे प्रत्यक्षदर्शनी आढळल्याने रोहित दिलीप चव्हाण (वय ३९) व विशाल किसन चव्हाण (दोघे रा. तळिये) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावर आढळलेली वाळू, ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण २ लाख ५५ हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. यावेळी आरोपी विशाल चव्हाण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. दरम्यान, याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल तुषार ढोपरे यांनी दिली. पुढील तपास पोलीस नाईक मुलाणी करत आहेत.