सातारा : कोरोना महामारीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच चारचाकी चालकांवर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्यांच्यावर कारवाई केली आहे, त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
सातारा येथील वेदभवन मंगल कार्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या सार्वजनिक रस्त्यावर चारचाकी (एमएच- ११ सीडब्ल्यू- ५७५४) चालवत लोकांच्या जीवितास धोका होईल, असे विनाकारण फिरणाऱ्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अतुल मच्छिंद्रनाथ ननावरे (सध्या रा. ममता बंगला, पीरवाडी, सदरबझार, सातारा. मूळ रा. एकंबे, ता. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई संतोष शेलार यांनी दिली आहे.
कोरोना महामारीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असताना आणि फक्त अत्यावश्यक वाहनांना जाण्या- येण्यासाठी परवनानगी असताना मतकर कॉलनी, कच्छी बाजारच्या समोर रस्त्यात विनाकारण वाहन आडवे लावून संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. स्मिता सौरभ गांधी (वय ३०, रा. समर्थनगर, आयटीआयसमोर, सातारा), निखिल किशोर पंडित (वय ३०, रा. शिवालय अपार्टमेंट, सी विंग, शाहूपुरी, सातारा), आरीफ दस्तगीर बागवान (वय ५०, रा. प्रतापगंज पेठ, सातारा), रमजान महबूब बागवान (वय ५६, रा. बुधवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कॉन्स्टेबल पंकज मोहिते यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.
साताऱ्यातील मोती चौकात सुरेंद्र मोतीलाल दोशी (एमएच- ११ बीजी- ३७२३), वनिता राजेश निपाणे (एमएच- ११ सीव्ही- ४१२६), धनश्री व्यंकट सावंत (एमएच- ११ सीएल- ४७४७) हे त्यांच्या दुचाकीवरून विनाकारण फिरत होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार हवालदार शंकर गायकवाड यांनी दिल्यानंतर तिघांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार आशिष कुमठेकर हे करत आहेत.