पाटण/कोयनानगर : पाटण तालुक्यातील आठ खासगी सावकारांविरोधात पाटण व कोयना पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच या सावकारांनी संबंधितांना मारहाण करण्याचीही धमकी दिली आहे.याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी नवनाथ आनंदा बोलके (वय ५४, रा. बिबी, ता. पाटण) यांना संशयित आरोपी एकनाथ अंतू जाधव, विठ्ठल लक्ष्मण पाटील, गणेश जाधव व सोन्या आनंदा निकम (सर्व रा. बिबी, ता. पाटण) यांनी सावकारी व्यवसायाचा कसलाही परवाना नसताना पन्नास हजार रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने दिले होते. त्यापोटी नवनाथ बोलके पाच हजार रुपये महिन्यास देत होते. दि. ७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीकडून ६५ हजार रुपयांचा धनादेश लिहून घेऊन तसेच कोऱ्या स्टॅम्पपेपरवर सह्या घेण्यात आल्या होत्या. तसेच मुद्दल व व्याज दिले नाही तर हात-पाय तोडून टाकीन, अशी धमकीही फिर्यादी बोलके यांना देण्यात आली होती. त्यामुळे बोलके यांनी पाटण पोलिसांत संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार संशयित चारजणांविरोधात पाटण पोलिसांत बेकायदेशीर सावकारी केली म्हणून सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गोतपागर करीत आहेत.दरम्यान, कोयना विभागातील विठ्ठल सदाशिव यमकर (४२, रा. नानेल, ता. पाटण) या युवकाने दोन वर्षांपूर्वी दहा टक्के व्याजाने खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडले होते. तरीही अजून पैशाची मागणी करून खासगी सावकारांनी कर्ज घेणाºया युवकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कोयना पोलीस ठाण्यात पाटण तालुक्यातील चार खासगी सावकारांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, कोयना विभागातील नानेल या गावातील विठ्ठल सदाशिव यमकर या गवळी समाजातील युवकाने दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या मेंदूची शस्त्रक्रिया व पाळीव जनावरे विकत घेण्यासाठी रामापूर (ता. पाटण) येथील दिलीप विष्णू पाटील (४२) याच्याकडून दहा टक्के व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. याबदल्यात त्याने आतापर्यंत दोन लाख ३५ हजार रुपये दिले आहेत. सर्व पैसे देऊनही खासगी सावकार दिलीप पाटील हा विठ्ठल यमकर यांच्याकडे अजून एक लाख २० हजारांची मागणी करत होता. विठ्ठल यमकर याने सुनील गंगाराम यमकर व चंद्र्रकांत रामचंद्र जाधव (दोघे रा. मारुल तर्फ पाटण) या दोन खासगी सावकारांकडून दहा टक्के व्याजाने ऐंशी हजार रुपये, तर रामचंद्र बावधाने (रा. पिंपळोशी) याच्याकडून एक लाख रुपये घेतले होते. दहा टक्के व्याजाने घेतलेले सर्व पैसे परत देऊनसुद्धा हे सर्व जादा पैशांची मागणी करत होते. तसेच पैसे न दिल्यास जनावरे घेऊन जाण्याची व जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे विठ्ठल यमकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.याप्रकरणी चारजणांविरोधात कोयनानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास हवालदार एस. आर. चव्हाण करीत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यातील आठ खासगी सावकारांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:22 AM