सातारा : परळी (ता. सातारा) येथील बांबर (केळवली) येथे मळणीसाठी काढून ठेवेलला गहू, ताडपत्री आणि वाळलेले शेणखत पेटवून देत १७ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील सुनीता सखाराम जानकर (वय ४५, रा. बांबर - केळवली, पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी त्यांच्या घराशेजारी दहा हजार रुपये किमतीचा गहू मळणीसाठी काढून ठेवला होता. याच्या शेजारीच दोन हजार रुपयांची काळ्या रंगाची ताडपत्री आणि पाच हजार रुपये किमतीचे वाळलेले शेणखत ठेवले होते. शंकर दादू जानकर (रा. बांबर - केळवली, पो. नित्रळ, ता. सातारा) याने गुरुवार, १८ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हे सर्व मुद्दामहून पेटवून दिले. याप्रकरणी सुनीता जानकर यांनी तक्रार दिल्यानंतर शंकर जानकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार दीपक बर्गे करत आहेत.