सातारा : तालुक्यातील गणेशवाडी येथे महावितरण उपकेंद्र इमारतीच्या आवारात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सुखदेव हणमंत मोहिते (वय ३५, नागठाणे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशवाडी येथील महावितरण उपकेंद्र इमारतीच्या आवारात शुक्रवार, दि. २ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुखदेव मोहिते याने मद्यपान करुन मोठमोठ्याने आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावेळी सुखदेव याने अंकुश रामचंद्र ढाणे (वय ३४, रा. पाडळी, ता. सातारा) आणि त्यांच्या एक सहकाऱ्याला दमदाटी करुन सार्वजनिक कामात अडथळा आणला. या घटनेनंतर अंकुश ढाणे यांनी रात्री उशिरा अकरा वाजण्याच्या सुमारास सुखदेव याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.