सातारा : पहाटे पाचपासून स्पर्धकांना ध्वनीक्षेपकावर सूचना देऊन ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यामध्ये सातारा शहरात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य व देशभरातून स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांनी पोलीस परेड मैदानावर ध्वनीक्षेपकाची परवानगी घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना पहाटे सहा ते सकाळी आठपर्यंत परवानगी दिली होती. परंतु आयोजकांनी पहाटेपासूनच ध्वनीक्षेपक लावून ध्वनिप्रदूषण केली.
याबाबत काही नागरिकांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. पहाटेच्या सुमारास अनेकांची झोपमोड झाली, अशा नागरिकांनी पोलिसांना फोन करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शाहूपुरी पोलिसांनी सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला.