शिरवळ : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावत विनापरवानगी धनगरवाडी येथील जगताप हाॅस्पिटलमधील कोरोना केअर सेंटरमध्ये घुसत फोटो व व्हिडीओ चित्रिकरण केले. आरोग्यविषयक खबरदारी न घेता परिचारिकांच्या कामात अडथळा आणत कोरोना संसर्ग वाढण्याची कृती केल्याप्रकरणी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह आठजणांविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनगरवाडी याठिकाणी तालुका प्रशासनामार्फत कोरोनाग्रस्त रुग्णांकरिता जगताप हाॅस्पिटलचे अधिग्रहण करून कोरोना केअर सेंटर उभारले आहे. या रुग्णालयावर वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांच्या देखरेखीखाली खंडाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांचे नियंत्रण आहे.
दरम्यान, सोमवार दि. १९ रोजी दुपारी साडेतीन वाजता सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह आठजण जगताप रुग्णालयामध्ये आले. त्याठिकाणी बंदोबस्ताकरिता असणाऱ्या होमगार्डनी, आपण अधिकृत परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा संबंधितांनी नाही म्हणत, कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या ठिकाणी प्रवेश करीत त्याठिकाणचे फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कृत्यामुळे कोरोना रुग्णांना सेवा पुरविणाऱ्या परिचारिकेच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला. यावेळी संबंधितांनी त्याठिकाणी फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले.
दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या जमावबंदी व संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी तसेच वाई प्रांताधिकारी व खंडाळा तहसीलदार यांची परवानगी न घेता विनापरवानगी रुग्णालयामध्ये प्रवेश केल्याप्रकरणी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह आठ जणांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद मंडलाधिकारी शिवाजी मरभळ यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव तपास करीत आहेत.