वाई : अत्याचाराच्या खटल्यातून सुटायचे असेल तर पन्नास कोटी रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मनीष हरीष मिलानी यांना खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सागर सूर्यवंशी (रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांपैकी एकाचे नाव आहे.पुणे येथील मनीष मिलानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलांनी सागर सूर्यवंशीला कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले होते. अश्फाक मेहबूब खान हा त्याचा चालक आहे. सूर्यवंशी याने वडिलांच्या नावाची जमीन परस्पर त्याच्या पत्नीच्या नावाने केल्याची बाब एप्रिल २०१४ मध्ये निदर्शनास आली.
त्याने २०१५ मध्ये बनावट स्टँप वापरून ती जमीन सय्यद हुसेनी याच्या नावाने केल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यावरून चिडून सागरने पालघर, भिवंडी, पुणे, वाई, कोरेगाव पोलीस ठाण्यात त्रयस्थ व्यक्तीमार्फत खोट्या तक्रारी केल्या.
वाई पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या कामी मनीष हे वाई येथे आॅगस्टमध्ये आले होते. चौकशी झाल्यानंतर ते शिवाजी चौकात चहा घेत असताना अश्फाक व एक महिला आली. त्यांनी सागर फोनवर आहेत म्हणून फोनवरून खंडणी मागितली.