सातारा : ‘रस्त्यातून बाजूला हो, मला जाऊ दे,’ असे म्हटल्याच्या कारणावरून सातारा तालुक्यातील नागठाणे येथील एका युवकास मारहाण करून शिवीगाळ तसेच दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जलवा पारधी आणि बोरमशीन पारधी (दोघे रा. नागठाणे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, मौला बंदगी साहब नदाफ (वय २४, रा. नागठाणे, ता. सातारा) हे गुरुवारी, दि. ११ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चारचाकीने जात होते. गावच्या हद्दीत असणाऱ्या नागठाणे केंद्रशाळेसमोर आले असता जलवा पारधी हा रस्त्यातच उभा होता. यावेळी मौला बंदगी साहब नदाफ यांनी त्याला रस्त्यातून बाजूला हो, मला जाऊ दे, असे सांगितले. या कारणावरून जलवा पारधी याने त्यांना मारहाण केली. याचवेळी समवेत असलेल्या बोरमशीन पारधी यानेही मौला नदाफ यांना शिवीगाळ करत मारहाण, दमदाटी केली.
या प्रकारानंतर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात जलवा पारधी आणि बोरमशीन पारधी या दोघांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी भेट दिली असून अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक फरांदे हे करत आहेत.