शाहूपुरी : बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश करून कुलूप तोडून दोनशे रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून अॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह चार महिलांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.सातारा बसस्थानकाच्या आगार प्रमुख नीलम गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ रोजी दुपारी चार वाजता बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रामध्ये अॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह चार महिलांनी अनधिकृतपणे कुलूप तोडून प्रवेश केला. तसेच दोन रुपयांचे नुकसान केले. यावरून शहर पोलिसांनी वर्षा देशपांडे यांच्यासह चार अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.बसस्थानकातील झुणका भाकर केंद्रामध्ये तिसऱ्या दिवशी महिला ठाण मांडून होत्या. दुपारच्या सुमारास संबंधित महिलांनी केंद्राबाहेर वडापावचीही विक्री केली. गेल्या तीन दिवसांपासून एसटी महामंडळाचे अधिकारी शहर पोलिस ठाण्यात हेलपाटे मारत होते तर दुसऱ्या बाजूला संबंधित महिला झुणका भाकर केंद्रामध्ये तळ ठोकून राहिल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकामध्ये अद्यापही वातावरण तणावाचे आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर झुणका भाकर केंद्राला सील ठोकण्यात आले होते. मात्र, रविवारी दुपारी कुलूप तुटल्याचे आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रकार शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)जेसीबी अखेर झाला गायब !बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राला लावलेले सील तोडल्यानंतर केंद्र उद्ध्वस्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, जेसीबी चालकाला दमदाटी झाल्याने त्याला केंद्रापासून काही अंतरावर उभे राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु तो तेथून निघून गेला. तो अद्याप त्या ठिकाणी फिरकलाच नाही. जेसीबी आणून प्रशासनाला काय करायचं होतं. हे कोणालाच समजलं नाही.
वर्षा देशपांडे यांच्यावर गुन्हा
By admin | Published: March 07, 2017 10:23 PM