सातारा : भरधाव वेगाने गाडी चालवल्याने अपघात होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आकाश अशोक भोसले (वय २१, रा. शिरगाव, ता. वाई) आणि विश्वजित रुद्राक्ष साळुंखे (रा. भुईंज, ता. वाई) हे दोघे २६ फेब्रुवारीला कंपनीतील शिफ्ट संपल्यानंतर दुचाकीने भुईंजला जात होते. यावेळी विश्वजित साळुंखे हे दुचाकी चालवत होते. सुरूर, ता. वाई येथे महामार्गावर रात्री दीडच्या सुमारास खडीवरून त्यांची दुचाकी घसरली व रस्ता दुभाजकाला धडकली. दुचाकी भरधाव असल्याने दोघेही सेवारस्त्यावर फेकले गेले. या अपघातात विश्वजित साळुंखे यांच्या छातीला आणि पोटाला मार लागला; तर आकाश भोसले हे किरकोळ जखमी झाले. साळुंखे यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे साळुंखे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आकाश भोसले याने दिलेल्या फिर्यादीनुसार भरधाव गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विश्वजित साळुंखे यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.