वाई : लाखानगर वाई येथे दारू विक्री करणाऱ्या एका युवकावर वाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून कारसह १ लाख १२ हजार ८४० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
लाखानगर येथे रस्त्याच्या कडेला कारमध्ये (एम. एच. १४, एक्स ०३१३) देशी दारुची चोरटी दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली होती. त्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले. या छाप्यात कारमधून देशी दारूने भरलेले पाच बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी याप्रकरणी अजय किरण घाडगे (१९, रा. लाखानगर वाई) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, संजय मोतेवार, कृष्णराज पवार, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी केली.