औंध : पिंपळवाडी (ता. खटाव) येथील युवकाने अल्पवयीन मुलीस वारंवार त्रास होईल, असे वर्तन केल्यामुळे त्याच्या विरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुळे असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, तुषार सुळे हा औंध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. दि. ९ जून रोजी तुषार सुळे हा अल्पवयीन मुलगी शेतात काम करत असताना त्या ठिकाणी जाऊन त्याने संबंधित मुलीशी अश्लील व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्याचा प्रयत्न केला. झाला प्रकार मुलीने आई वडिलांना सांगितला. त्यानंतर ही बाब मुलीच्या वडिलांनी तुषार सुळे याच्या कुटुंबीयांच्या कानावर घातली. मात्र, त्यानंतर ही त्याने ५ जुलै रोजी मुलीच्या मोबाईल फोनवर काॅल करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला.
वारंवार होणारा मानसिक त्रास लक्षात घेऊन मंगळवारी रात्री उशिरा तुषार सुळच्या याच्याविरोधात औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करीत आहेत.